दोन कुत्र्यांचा फडशा : सावधानतेचा इशारा
वारणानगर/प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे – सातवे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याने शेत वस्तीवरील दोन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वन विभागाने या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
बच्चे सावर्डे – सातवे परिसराच्या सिमेवर सीमेवर असलेल्या तळीच्या माळातील शेतीला दोन दिवसापूर्वी शरद यादव हे रात्री पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या ५० फुटाच्या अंतरावरती दिसला. त्यांनी बॅटरीने त्याच्या वरती प्रकाश टाकला असता त्याच्यावर चाल करून येत असताना त्यांनी आपल्या हातातील फावड्याणे आवाज केले असता बिबट्या मागे सरला. त्यानंतर ते घरी परतल्यावर त्यांनी शेतातील प्रसंग घरच्यांना संगीतला. तर यावेळी बिबट्याने कृष्णात हुजरे, राजू नायकवडी या दोघांच्या पाळीव कुत्र्याचां फडशा पाडला.
परिसरात बिबट्या आल्याची माहिती दिल्यावर वन विभागाचे वनपाल विजय दाते, वनरक्षक संदिप पाटील यांनी सावर्डे येथे भेट देवून बिबट्याच्या पावलाचे ठसे पाहून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले. बच्चे सावर्डेचे सरपंच बाळासाहेब पाटील व पोलीस पाटील सागर यादव, वारणा बॅंकेचे संचालक विनायक बांदल यांनी ग्रामस्थांना बिबट्या परिसरात आल्याची सूचना दिली आहे. तशीच सूचना सातवे येथे देण्यात आली आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
बच्चे सावर्ड – सातवे परिसरात बिबट्या आल्याचा अहवाल वनपाल विजय दाते, वनरक्षक संदीप पाटील यानी दिल्यावर वनविभागाचे पन्हाळा परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यानी नागरिकांनी शेतात जाताना एकटे जावू नये समूहाने शेतात जावे तसेच बेसावधपणे शेत पिकात प्रवेश करू नये नागरिकानी स्वत्ताची काळजी व्यावी असे आवाहन करून बिबट्याला पकडण्यासाठी उपाय योजना सुरू केल्याचे सांगीतले.- वनक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते









