पुणे / प्रतिनिधी :
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर पुणे) जनुकीय संशोधनासाठीची राष्ट्रीय प्रयोगशाळा (नॅशनल फॅसिलिटी फॉर जिन फंक्शन इन हेल्थ अँड डिसिज) उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेअंतर्गत उंदीर, ससा अशा प्राण्यांवर चाचण्या करण्यात येणार असून, कर्करोग, मधुमेह अशा विविध आजारांवर उपचारपद्धती विकसित करण्यासाठीचे संशोधन केले जाईल.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नुकतेच या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत शास्त्रज्ञांना संशोधनासाठी आवश्यक प्राणी आयात करावे लागत होते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक होती. त्यामुळे आयसर पुणे, केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्यातर्फे ही सुविधा विकसित करण्यात आली. या अंतर्गत मिळणारा निधी संशोधनासाठी उंदीर, ससा अशा प्राण्यांचे प्रजनन, जिनोटायपिंग, देखभाल, प्रयोगशाळांना संशोधनासाठी प्राणी पुरवणे अशी कामे केली जात आहेत.
नॅशनल फॅसिलिटी फॉर जिन फंक्शन इन हेल्थ अँड डिसिजचे अध्यक्ष डॉ. सिद्धेश कामत म्हणाले, मानवी आरोग्य आणि आजारांच्या अनुषंगाने संशोधन करताना मानवी शरीरातील जनुकांचे विविध आजारांच्या अनुषंगाने उत्परिवर्तन करून त्याच्या चाचण्या उंदीर, ससा अशा प्राण्यांमध्ये केल्या जातील. कोणत्याही आजाराबाबत संशोधन करण्यासाठी, लस निर्मिती करण्यासाठी मानवी चाचण्या करण्यापूर्वी प्राण्यांवर चाचण्या केल्या जातात. त्यामुळे या चाचण्यांमधून मधुमेह, कर्करोग, चयापचयाचे आजार, हृदयविकार असा वेगवेगळे आजार होण्याची कारणे, त्याची प्रक्रिया समजून घेण्याबरोबर त्यावर नवीन उपचार पद्धती कशी विकसित करता येईल या बाबतचे संशोधन करण्यात येईल.








