विमानतळावरील पार्किंग आवारात बस पडली बंद
प्रतिनिधी /बेळगाव
‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ या म्हणीचे प्रत्यंतर सध्या ‘रेल टू एअर’ या बसफेरी दरम्यान येत आहे. मंगळवारी सकाळी विमानतळावरील पार्किंग आवारात बस बंद पडली. त्यामुळे वाहक व तेथील प्रवाशांना बसला धक्का देण्याची वेळ आली. त्यामुळे जुन्या बस विमानतळावर पाठविल्या जात असल्याने परिवहन मंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठविली जात आहे.
मोठा गाजावाजा करत गुरुवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते रेल टू एअर या बसफेरीचे उद्घाटन करण्यात आले. सांबरा विमानतळापासून ते रेल्वेस्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी विशेष बस सुरू झाली. परंतु बसफेरी सुरू झाल्यापासूनच काही ना काही समस्या येत आहे. हुबळीपेक्षा बेळगावमध्ये तिकीटदर अधिक असल्याने अनेकांनी परिवहन मंडळाकडे तक्रार केली. तर अवघ्या दोन दिवसात वेळेवर बस येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
मंगळवारी तर नव्याने सुरू करण्यात आलेली बस बंद पडली. विमानतळाच्या पार्किंगपासून वाहक व प्रवाशांना ढकलत नेऊन बस सुरू करावी लागली. बस ढकलतानाचा क्हिडिओ काही प्रवाशांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला. मेंटनन्स नसणारी बस या मार्गावर सोडली जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.









