ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचीही लगबग सुरू झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने दोन दिग्गजांना डच्चू देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारमधील पक्षाचे नेते आमशा पाडवी यांना यावेळी संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे आमदार होते. मात्र, आता या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. सुभाष देसाई हे राज्याचे उद्योगमंत्रीही आहेत. त्यामुळे देसाई यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यास ते पुढे जास्तीत जास्त 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतात.
शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना संधी दिली आहे.