शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत माहिती : मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठानकडून तिथीनुसार सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनदेखील तिथीप्रमाणे व्हावा, असा आग्रह भिडे गुरुजींनी नेहमी ठेवला आहे. त्यामुळे 12 जून रोजी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी दिवशी सकाळी 6.30 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी दिली.
सोमवारी छत्रे वाडा येथे आयोजित केलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावषी कोरोनाचे निर्बंध दूर झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळय़ानंतर देवदर्शन यात्रा काढली जाणार आहे. छत्रपती शिवाजी उद्यानापासून ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत देवदर्शन यात्रा काढून कपिलनाथाचे दर्शन घेतले जाणार आहे. यावेळी सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला परशुराम कोकितकर, अजित जाधव, विश्वनाथ पाटील, पुंडलिक चव्हाण, कलाप्पा पाटील, अनंत चौगुले, गजानन पवार, प्रवीण मुरारी, मोहन जोई, हिरामणी मुचंडीकर, महेश संभाजीचे, संदीप पाटील, महेश जांगळे, आशुतोश कांबळे, शुभम पाटील यासह मोठय़ा संख्येने शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.









