वार्ताहर /खानापूर
खानापूर मलप्रभा नदीघाटाच्या दुरुस्तीसाठी मलप्रभा नदीघाट व्यवस्थापन कमिटीतर्फे दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे. मागील वषी महापुरामुळे निकामी झालेल्या दगडी फरशांचे व इतर डागडुजीचे काम हाती घेतले आहे. कामासाठी जवळपास 1 लाखाचा खर्च अपेक्षित असून घाट व्यवस्थापन कमिटीने लागणाऱया साहित्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.
नदीघाट दुरुस्तीसाठी आर्थिक सहकार्य करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी तरुण भारतमधून आवाहन करण्यात आले होते. यासाठी अनेकांनी सहकार्य जाहीर केले आहे. मलप्रभा नदीघाट व्यवस्थापन कमिटीचे सदस्य सुभाष देशपांडे, वसंत देसाई, आर. पी. जोशी, सिद्धार्थ कपिलेश्वरी, राजू पासलकर, बाबू निरलगी, शार्दुल जोशी, बाबा विद्यानंद बनोसी, किरण यळ्ळूरकर, सर्वज्ञ कपिलेश्वरी या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. मलप्रभा नदीवरील दोन्ही बाजूच्या घाटावरील फरशा महापुराने ढासळल्या आहेत. काही फरशा वाहून गेल्या आहेत. घाट दुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य करू इच्छिणाऱयांनी खानापूर को-ऑप. बँकेमध्ये नदीघाट कमिटीच्या खात्यावर रक्कम जमा करावी किंवा वसंत देसाई, सुभाष देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









