अहवाल आल्यानंतर नियम जारी करण्याबाबत घेणार निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील विविध जिल्हय़ांमधील कोरोना परिस्थितीचा अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना दिली आहे. या अहवालाच्या आधारे राज्यात कोरोना नियंत्रणासाठी नियम लागू करण्यात येणार आहेत.
राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. बेंगळुरात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱयांकडून कोरोना स्थितीविषयीचा अहवाल मागविण्याची सूचना आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. हा अहवाल लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर एक-दोन दिवसांत कोरोना नियंत्रणासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
घाबरण्याची आवश्यकता नाही
बेंगळूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याविषयी कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. कोणत्या जिल्हय़ात संसर्ग अधिक आहे, हे पाहून नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील. याविषयीचा अहवाल आपण मागविला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत देण्यात येणार आहे. मदत न मिळालेल्या काही प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन मदत देण्यात येईल, असे आश्वासनही बोम्माई यांनी दिले.
बेंगळूरमध्ये मास्क सक्तीची सूचना
बेंगळूरमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने शहरात मास्कचा वापर सक्तीचा करावा, अशी सूचना बेंगळूर महापालिकेचे विशेष आयुक्त के. हरिशकुमार यांनी दिली आहे. बेंगळूरमध्ये दररोज 220 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात मास्कसंबंधी मार्शलांना सूचना देण्यात आल्या आहेत. बेंगळूरमध्ये कोविड चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहेत. यापूर्वी दिवसाला 16 हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता हा आकडा किमान 20 हजारपर्यंत वाढविण्यात आला आहे.









