सोळा वर्षानंतर बसला पुतळा; नागरिक शिवप्रेमीमध्ये आनंद; लवकरच भव्य लोकार्पण सोहळा होणार
जत, प्रतिनिधी
गेल्या 16 वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या जत शहरातील शिवाजी पेठेतील शिवरायांच्या पुतळ्याची काल सहा जून शिवराज्याभिषेक दिनी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. शहराची अस्मिता असणारा शिवरायांचा पुतळा अखेर बसल्याने नागरिकांसह, शिवप्रेमींनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.
शिवाजी पेठेतील जुन्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला 2006 चाली एका वाहनाच्या धडकेने अपघात झाला होता. त्यामुळे येथील पुतळा काढून तो नव्याने बसवण्याचा निर्णय करण्यात आला. यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु अनेक अडचणीमुळे हा पुतळा बसण्यास तब्बल सोळा वर्षांची प्रतीक्षा जतकरांना करावी लागली. पुतळा तयार झाला, तो जतेत आणल्यानंतर प्रशासनाने परवानगी घेऊनच पुतळा बसवण्यात यावा असे सांगितल्या नंतर समिती अध्यक्ष विलासराव जगताप, प्रकाशराव जमदाडे व सदस्यांनी सर्व परवानग्या अवघ्या चार महिन्यात मिलवल्या. अखेर शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधत सोमवारी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला.
सकाळी सव्वा बारा वाजता पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोल पंपावरून नव्या अश्वारूढ पुतळ्याची पारंपारिक वाद्य आणि फुलांनी सजवलेल्या कंटेनरमधून जत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. तब्बल तीन तासांहून अधिक काळ ही मिरवणूक चालली. या निवडणुकीत शहरासह तालुक्यातील नागरिक, सर्वपक्षीय नेते , शिवप्रेमी ,महिला, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात शिवरायांची मूर्ती शिवाजी पेठ येथे आणण्यात आली.
शिवाजी पेठेतील चबुतरऱ्या जवळ मूर्ती आल्यानंतर येथे पूर्वीप्रमाणेच जत शहराकडे तोंड करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विधिवत पूजा, पाच नद्यांच्या पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर खासदार संजय काका पाटील, समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सुरेशराव शिंदे, प्रकाशराव जमदाडे, मन्सूर खतीब, मनोज जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेश रामघरे, महेश मोहिते, मुख्याधिकारी वाघमोडे, शिल्पकार गजानन सलगर, संग्राम जगताप, सुनील पवार, सरदार पाटील, उमेश सावंत, आप्पा पवार, सुजय नाना शिंदे , संजयराव कांबळे, प्रभाकर जाधव, मोहन भैय्या कुलकर्णी, लक्ष्मण बोराडे, रणधीर कदम, विजय राजे चवान, अण्णा भिसे, संतोष मोठे, स्वप्नील शिंदे , राजू यादव, गौतम ऐवळे,उत्तम चव्हाण, बसवराज चवाण, निलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, संतोष भोसले , युवराज निकम, मकसुद नगारजी, अभय जमदाडे, अतुल मोरे, सुनील बागडे, इम्रान गवंडी, यांच्यासह सर्वपक्षीय नेते ,पुतळा समितीचे सदस्य, नागरिक, शिवप्रेमी, मराठा सेवा संघ, सामाजिक संघटना, यांच्या हस्ते नारळ फोडून आणि शिव मंत्र म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लवकरच लोकार्पण…
आज शिवराज्याभिषेक दिनी हा पुतळा बसवण्यात आला आहे . परंतु याचा लोकार्पण सोहळा लवकरच घेण्यात येणार आहे. तोवर पुतळा ठाकून ठेवण्यात येईल असे पुतळा समितीच्या वतीने सांगण्यात आले.
खासदारांनी धरला ठेका…
जत शहरातील शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचया सोहळ्यास खा.संजयकाका पाटील दिवसभर जतेत होते. मिरवणुकीत त्यांनी शिव गितावर ठेका धरला. त्यांच्या सोबत प्रकाश जमदाडे, सुरेशराव शिंदे, भैय्या कुलकर्णी, आप्पा पवार, सुनील पवार, उमेश सावंत आदी नेते सहभागी झाले होते.
दिशा ठरवणे वरून वाद…
आज नव्याने बसविण्यात आलेला शिवरायांचा पुतळा पूर्वीप्रमाणे जत शहराकडे तोंड करून की पश्चिमेला तोंड करून बसवायचा यावरून आजी-माजी आमदारांमध्ये काही वेळ वाद झाला.यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु सर्वांच्या संमतीने हा पुतळा पूर्वीप्रमाणेच शहराकडे तोंड करून बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी सांगितले. पण दिशा पश्चिमेकडे असावी असे माझे मत होते.भविष्यात जर तो पश्चिमेकडे असावा असा सुर आल्यास त्यात मी दोषी असणार नाही, असे स्पष्ट मत जगताप यांनी व्यक्त केले.