व्हायरल होत आहेत नासाची छायाचित्रे
घरी अनेकांनी पिझ्झा पार्टी केली असेल. परंतु अंतराळातील पिझ्झा पार्टीचा किस्सा कधी ऐकला आहे का? अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनने (नासा) अशीच काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात नासाचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ‘पिझ्झा नाइट’ साजरी करताना दिसून येत आहेत.
“एक आर्बिटल रेस्टॉरंटचे दृश्य, येथे आमचे अंतराळवीर आमच्यावर सुमारे 250 मैलाची प्रदक्षिणा घालतात. परंतु ते कधीच पृथ्वीवरील आमच्या काही पसंतीच्या परंपरांपासून फार दूर नसतात, उदाहरणार्थ पिझ्झा नाइट’’ असे नासाने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
या छायाचित्रांमध्ये अंतराळवीर डेनिस माटेव, ओलेग आर्टेमयेव, सर्गेई कोर्साकोव, केजेल लिंडगेन, जेसिका वॉटकिन्स आणि सामंथा क्रिस्टोफोरेटी दिसून येतात. नासाच्या या छायाचित्रांमध्ये मोठी पसंती मिळत आहे. आतापर्यंत या छायाचित्रांना 4,18,539 लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. तर पोस्टवर शेकडो कॉमेंट्स आल्या आहेत.
अंतराळवीरांकडे कुठलीही पसंतीची डिश निवडण्याचा पर्याय असतो, भले मग ते पृथ्वीपासून 250 मैल अंतरावर का असोत. अंतराळ संस्थेचे जॉन्सन स्पेस सेंटर त्यांना शक्य ती सर्वप्रकारची सुविधा प्रदान करण्यास तत्पर आहे असे नासाने नमूद पेले आहे.
खाद्यपदार्थ नासा जॉन्सन स्पेस सेंटरच्या स्पेस फूड सिस्टीम्स लेबोरट्रीमधून अंतराळात पोहोचतात. अंतराळवीरांना मेन्यूमधून 200 हून अधिक खाद्यपदार्थ निवडण्याची मुभा असते.