सेन्सेक्समध्ये 93 अंकांची घट : इन्फोसिस नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार नकारात्मक कल दर्शवत बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू असून यात रेपो रेट वाढ होण्याचे संकेत आहेत. त्याचेच सावट बाजारावर होते. आयटी क्षेत्रातील इन्फोसिस आणि आयटीसी कंपन्यांनी मात्र सोमवारी तेजी राखल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 93 अंकांच्या घसरणीसह 55,675.32 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 14 अंकांच्या घसरणीसह 16,569.55 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये कंपन्यांचा विचार करता टाटा स्टील, इंडसइंड बँक, कोटक बँक, इन्फोसिस आणि आयटीसी या समभागांनी तेजी राखली होती.
सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 159 अंकांच्या नुकसानीसह 55,610 अंकांवर तर निफ्टीही जवळपास 54 अंक घटीसह 16,530 अंकांवर खुला झाला होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैसे कमकुवत होत खुला झाला. दिवसभरात सेन्सेक्सने 55,832 अंकांची उच्चांकी तर 55,295 अंकांची नीचांकीही नोंदली होती. निफ्टीतील सर्व क्षेत्रातील निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. सर्वात घसरण ही मीडिया निर्देशांकात दिसून आली, जे 2 टक्क्यांनी घटले आहेत. या पाठोपाठ एफएमसीजी, आयटी, मेटल, रियल्टी निर्देशांकही 1 टक्के घसरण नोंदवत बंद झाले आहेत.
दुसरीकडे एलआयसी मात्र अडचणीचा सामना करताना दिसली. एलआयसीने सोमवारी सकाळी नीचांकी स्तर गाठल्याचे दिसले. 782 रुपयांपर्यंत समभाग घसरल्याने कंपनीचे बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांवरुन 4.97 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. 949 या इशु किंमतीपेक्षा 17 टक्के समाभागाचा भाव घसरलेला आहे.
विदेशातील बाजारांचा कल पाहता अमेरिकन आणि युरोपीयन बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात निक्की 154 अंक, हँगसेंग 571 अंक, कोस्पी 11 अंक आणि शांघाई कम्पोझीट 40 अंकांच्या तेजीसह व्यवहार करताना दिसले.