जागतिक पर्यावरणदिनी आवाहन : मिरामार समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी /पणजी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील विविध सामाजिक संघटनांतर्फे मिरामार समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सम्राट क्लब, एनसीसी कॅडेटस्, पुनित सागर अभियान, पणजी महानगरपालिका आणि आयपीएससीडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभियानात एनसीसीच्या 100 पेक्षा जास्त केडेट्सनी सहभाग घेतला. त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी योगदान द्यावे व त्याद्वारे स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
सकाळी 7 वाजता हे अभियान प्रारंभ झाले. त्यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, आयुक्त आग्नेलो फर्नांडीस, मनपा अभियंते विवेक पार्सेकर, पणजी सम्राट क्लबच्या प्रेरणा पावसकर, आयपीएससीडीएलच्या निकिता गडकर, लेखा आणि कर अधिकारी सिद्धेश नाईक, पुनित सागर अभियानचे कर्नल एम. राठोड, ’सेन्सिबल अर्थ’चे संजीव सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
एनसीसी केडेट्सनी मिरामार किनाऱयावरील कचरा पिशव्यांमध्ये गोळा केला. ओला आणि सुका कचरा वेगळा करून विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. शहर स्वच्छ आणि हिरवेगार ठेवण्यासाठी नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली.
त्यावेळी बोलताना पावसकर यांनी, पणजी शहराच्या सुधारणेसाठी काम करणाऱया प्रकल्पांमध्ये सम्राट क्लब सदैव सहभागी असतो, असे सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनी आयोजित या उपक्रमाशी निगडीत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एक चांगले आणि स्वच्छ शहर घडविण्याच्या या उपक्रमांमध्ये तरुण पिढी देखील सहभागी होतील आणि आम्ही सुरू केलेले प्रयत्न चालू ठेवतील, अशी अपेक्षा पुनित सागर अभियानचे कर्नल एमकेएस राठोड यांनी व्यक्त केली.
सेन्सिबल अर्थने वितरित केल्या सहा हजार कापडी पिशव्या
दरम्यान, स्वच्छता मोहिमेनंतर सेन्सिबल अर्थचे संजीव सरदेसाई आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी पणजी मनपा मार्केटमध्ये सहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. त्यावेळी बोलताना सरदेसाई यांनी प्लॅस्टिक आणि नॅनो-प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. यावेळी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाटय़ आणि स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या.
नागरिकांना आकर्षित करणे तसेच कापडी पिशव्या प्रदर्शित करण्यासाठी मार्केटच्या मध्यभागी एक घुमट उभारण्यात आला होता. तेथे स्वयंसेवकांनी प्लास्टिक पिशव्या टाळण्यावर भर देतानाच सुमारे सहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.









