त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिरापासून धामणेला जाणाऱया शिवारात विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत. काही वाहिन्या तर जमिनीला टेकल्या असून, त्या परिसरात शेती करणे धोकादायक ठरत आहे. एकीकडे पेरणीची कामे सुरू असताना दुसरीकडे या विद्युत वाहिन्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गटारीचे खोदकाम करताना जेसीबीचा धक्का लागून विद्युतखांब कलंडला. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर जोर पडून त्या परिसरातील सर्वच विद्युतखांब कलंडले गेले असून, विद्युत वाहिन्या जमिनीलगत आल्या आहेत. शेतामध्ये मधोमध वाहिन्या पडल्या असल्याने पेरणीची कामे अर्धवट स्थितीत आहेत.
हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना याबाबत माहिती देऊनही त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.









