ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानात सुरु असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा उठली आहे. या अफवेने इस्लामाबादमधील वातावरण तणावपूर्ण झाले असून, पोलीस हायअलर्टवर आहेत. तसेच अफवेनंतर इस्लामाबाद शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे पाकिस्तानमधील नेते फवाद चौधरी यांनी म्हटले होते. त्यामुळे इम्रान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, आज इम्रान खान इस्लामाबाद येथे येणार होते. मात्र, त्यांच्या हत्येची अफवा पसरल्याने शहरात खळबळ माजली. त्यानंतर पोलीस यंत्रणा हायअलर्टवर आहे. इम्रान खान यांचे घर बनी गाला याचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी बनी गाला परिसरात विशेष सुरक्षा तैनात केली आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या परिसरात संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
इम्रान खान यांना कायद्यानुसार संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल आणि इम्रान यांच्या सुरक्षा पथकानेही तेच करणे अपेक्षित आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्यास तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल, असे इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी यांनी म्हटले आहे.