ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: अयोध्या (Ayodhya) दौरा हे राजकीय शक्तीप्रदर्शन नाही. श्रध्देने आम्ही चाललो आहोत.कोरोनामुळे आम्ही गेली अडीच वर्ष जाऊ शकलो नाही. म्हणून आता आम्ही जात आहोत. याठिकाणी अनेकांच्या भेटीगाढी होणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. 15 जूनला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्येला जाणार आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी, पूर्व तयारीसाठी आज अयोध्येला जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी काश्मीरच्या मुद्यावरुन त्य़ांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना देशातील केंद्र सरकार सत्तेची आठ वर्ष साजरी करण्यात व्यस्त आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
काश्मिरमध्ये 20पोलिसांची हत्या होते. मात्र देशाच्या गृहमंत्र्यांना त्याची पर्वा नाही. हजारो काश्मिर पंडित रोज पलायन करत आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.काश्मीर जळतंय आणि दिल्लीतले नेते चित्रपट प्रमोशनमध्ये गुंग आहेत.काश्मीर नागरीकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकार भाजपचे आहे. मात्र यावर एकही नेता तोंड उघडायला तयार नाही.अशी नाराजी त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, 1990 साली काश्मीरी पंडितांची हत्य़ा झाली तेव्हा भाजप सत्तेवर होते. आणि आजही भाजपचं सत्तेवर आहे. गेल्या आठ वर्षापासून तेच सुरु आहे. सर्जिकल स्टाईकने काश्मीरी पंडितांच्या हत्या कमी झाल्या नाहीत उलट वाढल्या असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल काश्मीरी पंडित यांचे पलायन आणि हत्याकांड याबाबत मनापासून संवेदना व्यक्त केल्या. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना काश्मीरच्या प्रश्नावर गांभीर्याने पाहणार आहे. त्यांच्य़ासाठी जे जे करण शक्य आहे ते आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काश्मीरचे आणि बाळासाहेबांचे एक नाते आहे ते कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.