महिला टेनिस एकेरीत अमेरिकेच्या गॉफवर एकतर्फी विजय, 2020 मधील जेतेपदाची पुनरावृत्ती
पॅरिस / वृत्तसंस्था
पोलंडच्या इगा स्वायटेकने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत कोको गॉफवर एकतर्फी विजय मिळवत महिला एकेरीचे जेतेपद संपादन केले. शनिवारी कोर्ट फिलीपे चॅट्रियरवर रंगलेल्या अंतिम लढतीत तिने 6-1, 6-3 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. या विजयासह स्वायटेकचा विजयी धडाका 35 व्या सामन्यातही कायम राहिला. स्वायटेक ही पोलंडला ग्रँडस्लॅमचे एकेरी जेतेपद मिळवून देणारी पहिली खेळाडू असून तिने यापूर्वी 2020 प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही असा पराक्रम गाजवला होता.
2020 मानांकनात पहिल्या 50 मध्ये समाविष्ट नसताना देखील स्वायटेकने ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपद मिळवण्याचा पराक्रम गाजवला होता. यंदाही तिने जेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
बक्षीस वितरण सोहळय़ात सर्वांना संबोधित करताना स्वायटेक बऱयाचदा भावूक झाली. यादरम्यान तिने रशियाविरुद्ध फेब्रुवारीपासून लढत असलेल्या युक्रेनप्रती सहानुभूती व्यक्त केली. युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या राष्ट्रध्वजाचे रंग असलेले रिबन ती वापरत होती. स्वायटेक फेब्रुवारीपासून अपराजित असून या निकषावर तिने व्हीनस विल्यम्सच्या 2020 मधील पराक्रमाशी बरोबरी साधली आहे.