वृत्तसंस्था/ डब्लीन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान आयर्लंडने विजयी सलामी दिली. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव केला. कर्णधार गॅबीने कप्तानी खेळी करत 52 धावा झळकविल्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकांत 7 बाद 143 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 133 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 10 धावांनी गमवावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या डावात कर्णधार गॅबीने 52 तर लि पॉलने 47 धावा झळकविल्या. गॅबीने 38 चेंडूत 52 तर पॉलने 42 चेंडूत 47 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे सेखुकुने 32 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 133 धावा जमविल्या. बॉश्चने 29 तर ट्रायॉनने 26 धावा केल्या. आयर्लंडतर्फे केलीने 25 धावांत 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकांत विजयासाठी 18 धावांची गरज होती.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड- 20 षटकांत 7 बाद 143 (गॅबी 52, लि पॉल 47, सेखुकुने 3-32), दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 133 (बॉश्च 29, ट्रायॉन 26, केली 2-25).









