धारवाड / प्रतिनिधी
जूनच्या अखेरीपासून देशभरात सिंगल-यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात येणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. अशा प्रकारच्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाला कायमस्वरुपी हानी पोहचते. सध्याच्या काळात प्लास्टिकचा उपयोग प्रचंड प्रमाणात वाढल्याने पर्यावरणासमोर गंभीर धोका निर्माण झाल्याने केंद्र सरकारला कठोर निर्णय घेणे आनिवार्य झाले आहे, असे सांगण्यात आले.
कर्नाटक सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी शोभा पॉल यांनी सिंगल यूज प्लास्टिक उपयोगावर कठोर नियंत्रण ठेवणारे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. या निर्देशांनुसार कोणीही अशा प्लास्टिकची विक्री करत असल्यास त्याच्यावर मोठा दंड आकारण्यात येईल, तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद साऱयांनी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जगातील बहुतेक देशांमध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे. भारतात मात्र, अशी बंदी सार्वत्रिक नाही. प्लास्टिकची विल्हेवाट लावणे जवळपास अशक्य असते. तसेच सिंगल-यूज प्लास्टिकचा पुनउ&पयोगही करता येत नाही. परिणाम अशा प्लास्टिक कचऱयाचे ढीगच्या ढीग रस्तोरस्ती पडलेले आढळतात. त्यामुळे भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आलेला आहे, असे समजते.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागाने 2021 च्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा आधार घेत, अनेक प्लास्टिक उत्पादनांची आयात, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री आणि उपयोगावर बंदी घालण्याचा विचार चालविला आहे. या उत्पादनांमध्ये प्लास्टिकच्या दांडय़ांची इयरबडस्, प्लास्टिकच्या दांडय़ा, फुग्यांसाठीच्या प्लास्टिक स्टीक्स, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टीक्स, आईस्क्रीम स्टीक्स, सजावटीसाठी पॉलिस्टिरीन (थर्मोकोल), प्लास्टिकच्या बशा, कप, ग्लासेस, प्कटलरी, काटे, चमचे, सुऱया, स्ट्रॉ, ट्रे, पॅकिंग किंवा रॅपिंग फिल्म्स, आमंत्रण पत्रिका, सिगारेट्स, पॅकेटस्, 100 मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर्स, स्टीकर्स इत्यादींचा समावेश आहे.









