वृत्तसंस्था/ कानपूर
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या दंगलीची पाळेमुळे पश्चिम बंगाल आणि मणिपूरपर्यंत आहेत, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या दंगलीत पॉप्युलर पंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेचा हात असल्याचे पुरावेही मिळाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
एका भाजप प्रवक्तीने महंमद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली, असा काही मुस्लीम संघटनांनी आरोप केल्यानंतर ही दंगल उसळली होती. कानपूर शहरातील बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाज पठणानंतर जमावाने दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक व्यापाऱयांनी त्याला प्रतिसाद देण्याचे नाकारल्यानंतर सक्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाला. तसेच दगडफेकही मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. अखेरीस पोलिसांनी दंगल आटोक्मयात आणली. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
या दंगलीला पैसा पुरविण्याचे काम तसेच भडकाऊ प्रचार करण्याचे काम पीएफआयच्या सदस्यांनी केले होते, असे पुरावे मिळाल्याचे कानपूरचे पोलीस आयुक्त विजयसिंह मीना यांनी स्पष्ट केले. काही आरोपींचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून छाननीचे काम सुरू आहे. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून गुन्हा विज्ञान विभागाकडे ते पाठविण्यात आले आहेत.
आरोपी लखनौमध्ये लपले
दंगलखोरांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईला प्रारंभ करताच दंगलीचे सूत्रधार लखनौमध्ये पळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेथे त्यांचा शोध घेतला जात आहे. या दंगलीचा सूत्रधार हयात जफर याला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी जावेद अहमद खान, राहिन आणि सुफियान यांनाही पकडण्यात आले आहे. या सर्वांना कानपूर बाहेरून अटक करण्यात आली. मुख्य आरोपी जावेद हा युटय़ूब चॅनल चालवत असून या चॅनलवरून प्रक्षोभक आशय प्रसारित केला जातो, असा आरोपही पोलिसांनी केला आहे. या आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) आणि गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यांच्या खासगी मालमत्तेवर बुलडोझर चालवून ती नष्ट करण्यात येणार आहे. हे आरोपी अनेक नावांनी कार्यरत होते. प्रत्येकाची पाच-सहा वेगवेगळी नावे होती, असे स्पष्ट होत आहे. दंगलीच्या चौकशीचे उत्तरदायित्व आयपीएस अधिकारी अजय पाल यांच्याकडे देण्यात आले आहे. आतापर्यंत तीन एफआयआर दाखल झाले आहेत.
राजकीय लाभासाठी दंगल
या दंगलीला काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची फूस होती, असे दिसून येत आहे. राजकीय लाभासाठीच ही दंगल पसरविण्यात आली, असे या घटनेच्या चोवीस तास आधी काही नेत्यांनी केलेल्या टेलिफोन कॉल्सचा मागोवा घेतला असता दिसून येत आहे. पोलीस आता या नेत्यांच्या टेलिफोन कॉल्सची सखोल माहिती घेत आहेत.

27 मे या दिवशी मौलाना मोहम्मद अली जोहर फॅन्स असोसिएशनचा अध्यक्ष हयात जफर हाशमी याने कानपूरमध्ये बाजारबंदचे आवाहन केले होते व भाजपच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल निषेध व्यक्त केला होता. 29 मे या दिवशी मुस्लीम समाजाच्या हजारो लोकांनी नमाजात भाग घेतला आणि नंतर मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा उद्देश दंगल घडविण्याचाच होता, असे तपासात दिसून आले आहे. अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये मुख्य आरोपी मौलाना मोहम्मद अली जोहर फॅन्स असोसिएशनचे हयात जफर, आदिल, इम्रान कालिया, सहर खान, अब्दुल शकील, अमिर जावेद, युसुफ अन्सारी, आफ्रिद असिफ, नासीर आशिक अली, मोहम्मद अकिब, मोहम्मद साजिद इत्यादी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
महनीय नेत्यांच्या उपस्थितीतही दंगल
दंगल घडली त्या काळात कानपूरपासून 50 किलोमीटर दूर अंतरावर परौख या गावी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. त्यांच्यासारखे मान्यवर शहरापासून जवळच उपस्थित असतानाही ही दंगल झाली. नऊ दिवसांपूर्वीपासूनच या दंगली घडविण्याची योजना आखण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.









