ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी कानपुर दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याआधी मोठा हिंसाचार घडून आला. मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात वादाची ठिणगी (Violence) पडल्याने दोन गटात तुफान दगडफेक (stone pelting) झाली. या दगडफेकीत दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कानपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी हयात जफर हाशमी (hayat zafar hashmi) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर काही ठिकाणी हिंसाचार उसळला. या प्रकरणातील मास्टर माईंड जफर हयातचा पोलीस शोध घेत होते. यासाठी पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी शनिवारी दुपारी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. हयात जफर हाश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याने यापूर्वी अनेकदा लोकांना भडकवले आहे आणि दंगली घडवून आणल्या आहेत. सीएए आणि एनआरसीच्या निषेधादरम्यानही तो खूप सक्रिय होता.
हिंसाचारामागे अनेकांचा हात असल्याचा संशय
हिंसाचारामागे अनेकांचा हात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, ज्यांनी गर्दी जमवून गोंधळ घातला. पोलीस अशा लोकांची माहिती गोळा करत आहेत. इंटेलिजन्सही आपल्या स्तरावरून अशा लोकांना खुणावण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या इतर अनेक शाखांनीही गुप्त पद्धतीने तपास सुरू केला आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण…
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांमध्ये नाराजी असून, शुक्रवारच्या नमाजनंतर कानपूरमध्ये गोंधळ झाला. दरम्यान, अल्पसंख्याक समाजाचे लोक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लोकांना हुसकावून लावले. जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी याआधीच मुस्लिम समाजाला शुक्रवारी व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. याचदरम्यान हा वाद चव्हाट्यावर आला.