ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने पुन्हा मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आता बंधनकारक असणार आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हा प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना पुन्हा राज्यात हातपाय पसरवत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने राज्य शासन नव्याने निर्बंध लावणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. हे मास्क तुम्ही घरी तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता. मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या. घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे, असेही या पत्रात म्हटले आहे.