शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास : अनर्थ घडण्यापूर्वी अवजड वाहतूक बंद करणे गरजेचे : रहदारी पोलीस नेमण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही राजरोसपणे वाहनांची वाहतूक सुरू आहे. कॅम्प येथे अरुंद रस्ता असून त्यात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात सापडत आहे. त्यामुळे अनर्थ घडण्यापूर्वी कॅम्प येथून अवजड वाहनांना बंदी घालावी अथवा याठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
कॅम्प परिसरात अनेक इंग्रजी व कन्नड माध्यमांच्या शाळा आहेत. त्यामुळे शाळेत सोडण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. काही रिक्षावाले थेट शाळेच्या दारात रिक्षा उभे करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. हिंडलगा, उचगाव, शिनोळी व पुढे महाराष्ट्रात जाणारी वाहने ग्लोब टॉकिजकडून कॅम्प येथून जातात. हा मार्ग जवळचा असल्याने अवजड वाहनेदेखील याच मार्गाने ये-जा करीत आहेत. अवजड वाहनांसाठी शहरात वेळेची मर्यादा असतानाही सध्या पोलिसांचे नियंत्रण नसल्याने शहराच्या कोणत्याही भागातून अवजड वाहतूक सुरू आहे.
शाळांमुळे विद्यार्थ्यांची गर्दी
कॅम्प परिसरात सकाळ व संध्याकाळच्या सुमारास शाळांमुळे गर्दी असते. त्यातच एखादे अवजड वाहन येऊन अडकल्यास वाहनांची गर्दी होत आहे. बऱयाचवेळा लहान विद्यार्थी रस्त्यावरील वाहने न पाहता पळत जातात. अवजड वाहनांची नेहमी ये-जा असल्याने कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी अवजड वाहतूक बंद करणे गरजेचे आहे. नित्याच्या वाहतूक केंडीमुळे पालक व वाहनचालकांमध्येही नाराजी आहे. याला काही पालकही जबाबदार असून शाळेपासून दूर चारचाकी वाहने थांबविल्यास कोंडी रोखता येणार आहे.
ट्रफिक मॅनेजमेंटकडे पूर्णतः दुर्लक्ष
रहदारी पोलिसांकडून शहराच्या ट्रफिक मॅनेजमेंटकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी 4 ते 5 रहदारी पोलीस थांबलेले असतात. परंतु जेथे वाहतूक कोंडी होते, तेथे मात्र कोणीच दिसून येत नाही. ग्लोब थिएटरजवळ नेहमी 3 ते 4 रहदारी पोलीस असतात. परंतु तेथून हाकेच्या अंतरावर असणाऱया कॅम्प भागात रहदारी पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या परिसरात त्वरित रहदारी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









