मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ’गोवा बीच व्हिजिल ऍप’चे सादरीकरण
प्रतिनिधी /पणजी
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात स्टार्ट-अप्सचा वाटा अभिनंदनीय असून स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी सरकारही वचनबद्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी स्टार्ट अप्सना पूर्ण प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नोंदणीकृत स्टार्ट अप्सना प्रमाणपत्रांचे वितरण आणि स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पर्वरी सचिवालयात काल शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ’गोवा बीच व्हिजिल ऍप’ लॉन्च केले आणि अशा प्रकारचे स्वच्छ व सुरक्षित पर्यटनासाठी सर्वसमावेशक ऍप तयार केल्याबद्दल गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
अभ्यासक्रम शुल्कात कपात
मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या स्टार्ट अप क्षेत्रात जाण्यासाठी सरकार तरुणांना प्रोत्साहन देत आहे. त्याच उद्देशाने सरकारने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कातसुद्धा कपात केली आहे. या प्रयत्नांमुळे राज्यात अधिकाधिक टेक्नोक्रॅट तयार होण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.
रोजगारनिर्मितीचे नवे माध्यम
या प्रसंगी बोलताना माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्यात स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणे आणि इकोसिस्टम सुधारण्यासाठी सरकार अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करेल, असे सांगितले. स्टार्टअप हे महसूल आणि रोजगार निर्मितीचे नवीन माध्यम बनले आहे, असेही ते म्हणाले.
बीच व्हिजिल मोबाइल ऍप
राज्यात किनारी भागात घडणाऱया कोणत्याही गुह्याचा अहवाल देणे, तसेच त्याचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने बीच व्हिजिल मोबाइल ऍप सुरू केले आहे. या ऍपच्या सुरुवातीच्या टप्प्यात पर्यटन विभाग, गोवा पोलीस, दृष्टी, शॅक मालकांना आणले जाईल. त्यानंतर ते डाउनलोड करण्यासाठी तसेच गुह्यांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी अनेक नोंदणीकृत स्टार्ट अपना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमास पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पर्यटन सचिव रवी धवन, माहिती तंत्रज्ञान संचालक प्रवीण वळवटकर आदींची उपस्थिती होती. पर्यटन संचालक निखिल देसाई, विवेक एचपी आदींनी विचार मांडले.









