आमदार ऋतुराज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद : दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा राज्यात आदर्श
प्रतिनिधी/कोल्हापूर
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्व 35 ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणारा कोल्हापुर दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारसंघातील 35 ग्रामपंचायतीनी अनिष्ठ प्रथा,रूढी (विधवा प्रथा) बंद करण्याचा संकल्प करून तसा ठराव मंजूर केला आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरने राज्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून विकासाची वाटचाल करणाऱया कोल्हापूर जिह्यातील हेरवाड गावाने ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव करून शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीतून जपला होता. हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील सर्व ग्रामपंचायतींनी असा निर्णय घेऊन राज्यासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या आठवडय़ात घेतलेल्या आढावा बैठकीत केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दक्षिण मतदारसंघातील सर्व 35 ग्रामपंचायतिनी ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव मंजूर केला आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगाव,गांधीनगर,सरनोबतवाडी, गडमूडशिंगी, वळीवडे, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, सांगवडेवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव, कणेरी, नेर्ली, हलसवडे, कणेरीवाडी, कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, पाचगाव, दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नंदगाव, गिरगाव, द. वडगाव-वड्डटवाडी, कोगील बुद्रुक, कोगील खुर्द, निगवे खालसा, वडकशिवाले, खेबवडे, चुये, नागांव व कावणे या ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
अभिमानास्पद व आदर्शवत निर्णय
आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करणाया सर्व ग्रामपंचायतींचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. माझ्या मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीनी राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या विचारांचा जागर करत स्त्री समानतेसाठी ठोस पाऊलं उचलली आहेत. या सर्व ग्रामपंचायतीनी घेतलेला निर्णय हा अतिशय अभिमानास्पद व आदर्शवत आहे. करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनाही यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे.- ऋतुराज संजय पाटील, आमदार, कोल्हापूर दक्षिण