पुणे / प्रतिनिधी :
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय 28, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथे अटक करण्यात आली असून, या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जुनेद यास 7 जून, तर आफताब यास 14 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जुनेद याच्या पोलीस तपासात त्याच्याकडे 15 फेसबुक खाती, सात व्हाट्सॲप खाती आणि 11 सिमकार्ड आढळली आहेत. या खात्यात शेकडो लोक सहभागी असून त्यांच्याकडे तपास करायचा असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.
शाह हा जुनैद आणि लष्करे तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकाने कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून 291 किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.
देशविरोधी कृत्यात आरोपी सहभागी
संबंधित दोन आरोपी लष्कर-ए-तोयबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेकरिता नवीन सदस्यांची भरती करणे, त्याकरिता आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देणे,अशा अवैध गोष्टी करीत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.