प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार महामार्गावर सध्या अपघातांची शृंखलाच चालू असून हे सर्व अपघात केवळ सदोष रस्त्यामुळे झालेले आहेत. या मार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण करताना रस्त्याच्या बाजूला नको तशा खळया ठेवण्यात आल्यामुळे समोरून येणाऱया वाहनांना बाजू देताना मालवाहू वाहने अपघातग्रस्त होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 1 रोजी करमल घाटात समोरून येणाऱया वाहनांना बाजू देताना पाईपवाहू वाहन कलंडले. त्यामुळे या वाहनाला 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागले. सुदैवाने मनुष्यहानी टळली. त्यातच भर म्हणून रस्त्याच्या बाजूला रिकाम्या बाटल्या फेकण्याच्या प्रकारांतही वाढ झालेली आहे. बाळ्ळी ते पोळेपर्यंतच्या भागात सात ते आठ ठिकाणी तालांव देण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलिस दबा धरून थांबतात. मात्र रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी रिकाम्या बाटल्या फेकणे त्याचप्रमाणे सदोष रस्त्यामुळे जे अपघात घडतात त्यांना कोण आळा घालणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करायला लागले आहेत.









