भाजप नेत्यांकडून घटनेचा निषेध
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाठय़पुस्तक पडताळणी समितीचे अध्यक्ष रोहित चक्रतीर्थ यांनी साहित्यिक कुवेंपू यांचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करून एनएसयुआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांच्या तुमकूर जिल्हय़ाच्या तिपटूर येथील निवासस्थानाला घेराव घातला. यावेळी आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यामुण्s पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठय़पुस्तक पडताळणी समितीने कुवेंपू यांचा अवमान केला आहे. बसवेश्वर, टीपू सुलतान यांच्याविषयीचे मुद्दे बदलून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. चक्रतीर्थ यांची समिती रद्द करण्यापेक्षा शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एनएसयुआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. एनएसयुआय संघटनेच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष कीर्ती गणेश यांच्या नेतृत्त्वाखाली 25 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या तिपटूर येथील निवासस्थानाबाहेर काही वेळ निदर्शने केली. याविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावून आले. जमावाला पांगविताना पोलीस आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. 15 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून घटनेचा निषेध नोंदविला आहे. त्यांनी बुधवारी रात्री तिपटूर येथील शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाला भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. शिक्षणमंत्री बुधवारी गुजरात दौऱयावर गेले होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे मंत्री बी. सी. पाटील, डॉ. अश्वथ नारायण यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी घटनेविषयी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.