भारतीय वायुदलाचा महत्त्वाचा निर्णय : स्वदेशी उद्योगांना मिळणार बळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वायुदलाने जगातील सर्वात मोठय़ा बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या खरेदी (एमआरएफए) प्रक्रियेत लढाऊ विमानांची संख्या निम्म्यावर आणली आहे. पूर्वी 114 लढाऊ विमाने खरेदी केली जाणार होती. परंतु आता हे प्रमाण 57 वर आणले गेले आहे. स्वदेशी संरक्षण उद्योगाला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संरक्षण कंपन्या आता ही मागणी पूर्ण करणार आहेत. डिफेन्स एक्वीजिशन प्रोसिजर 2020 अंतर्गत 57 लढाऊ विमानांसाठी विदेशी कंपन्यांना स्वतःचे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांना हस्तांतरित करावे लागणार आहे.
आत्मनिर्भर भारत प्रकल्पाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण उत्पादनाची आयात कमीत कमी करण्याचा यामागे उद्देश आहे. तसेच देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संरक्षण आधुनिकीकरणासाठी देशांतर्गत बाजारपेठेला सहाय्य आणि वृद्धी मिळवून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. भारतीय नौदल देखील 57 डेक बॉर्न विदेशी लढाऊ विमानांची खरेदी करणार होते. परंतु नौदलाने हे प्रमाण आता कमी करत 27 वर आणले आहे.
या निर्णयांमुळे देशांतर्गत संरक्षण कंपन्यांसाठी नामी संधी चालून आली आहे. भारतीय वायुदलाने 114 लढाऊ विमानांसाठी 2018 मध्ये जागतिक कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली होती. विदेशी कंपन्यांपैकी लॉकहीड मार्टिनने एफ-21, बोइंगने एफ-15ईएक्स आणि एफ/ए-18 सुपर हॉर्नेट, डॅसो राफेल, साब ग्रिपेन, युरोपियन कंसोर्टियम युरोफाइटर, सुखोई-एस 35 आणि मिग-35 यांनी या प्रक्रियेत स्वारस्य दाखविले होते.
बहुउद्देशीय कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या खरेदीसाठी 126 लढाऊ विमानांची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया यशस्वी ठरली नव्हती. अखेरीस फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यात आली होती. वायुदलाचे पुढील 15 वर्षांमध्ये 35 स्क्वाड्रन्स तयार करण्याचे लक्ष्य आहे. परंतु विदेशी लढाऊ विमानांना भारताची भौगोलिक स्थिती आणि तंत्रज्ञानानुसार बदलावे लागते, या प्रक्रियेत मोठा वेळ आणि पैसा खर्च होत असतो.
भारतीय वायुदलाला पुढील काही दशकांमध्ये मिराज-2000, मिग-29 आणि जग्वार लढाऊ विमानांना सेवेतून निवृत्त करावे लागणार आहे. मिग-21 च्या स्क्वाड्रन 2024 पर्यंत सेवेतून वगळाव्या लागतील. सध्या अत्याधुनिक राफेलच्या दोन स्क्वाड्रन यशस्वीपणे कार्यरत आहेत. 2024 पर्यंत 83 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एमके1ए प्राप्त होणार आहेत. एलसीए एमके-2 आणि ऍडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) चालू दशकाच्या अखेरपर्यंत वायुदलाच्या ताफ्यात सामील होतील.









