राजकीय दबाव, हप्त्यांची कारणे
प्रतिनिधी /मडगाव
सासष्टीतील रक्तरंजित धिरियोकडे पोलीस का दुर्लक्ष करतात हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. ठराविक ठिकाणी धिरियो होणार याची पूर्ण कल्पना पोलिसांना असते. मात्र, पोलीस त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करतात, त्यामागे कारणे अनेक असली तरी पोलिसांवर येणारा राजकीय दबाव हे मुख्य कारण मानले जात आहे. त्याचबरोबर पोलिसांना मिळणारा हप्ता हे दुसरे कारण आहे.
सर्वोच्च न्यायालयाने धिरियोच्या आयोजनावर बंदी घातली असली तरी या बंदीला ना जुमनता सासष्टीच्या किनारपट्टी भागात धिरियोचे आयोजन होत असते. एका धिरियोच्या आयोजनामागे लाखो रूपये खर्च केले जातात. रक्त रंजित धिरियोचा आनंद लुटण्यासाठी किमान 500 ते एक हजार लोकांची उपस्थिती सहज लाभते. जर सुट्टीचा दिवस असेल किंवा एखाद्या सणा-सुदिचा दिवस असेल तर 3 ते 4 हजार लोकांची उपस्थिती लाभत असते.
सासष्टीत धिरियोच्या आयोजनामागे राजकीय व्यक्तींचा सहभाग हा नेहमीच सक्रीय राहिला आहे. त्यामुळे धिरियो आयोजनाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे संकेतही आयोजकांना अगोदरच मिळत असतात. अशा वेळी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांना कारवाई न करण्यासंदर्भात आदेश दिले जातात. धिरियो आयोजक व पोलीस यांचे नेहमीच साटेलोटे राहिलेले दिसून येतात. सासष्टीतील अनेक राजकारणी या धिरियोकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित असतात.
वार्कातील धिरियो प्रकरणी गुन्हा नोंद
दरम्यान, कोलवा पोलिसांनी सोमवारी दुपारी वार्का येथे धिरियो आयोजित केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी दोन बैलांमध्ये धिरियो लावल्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, पोलिसांनी या धिरियोचे आयोजन झाल्याची कल्पना नसल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्याचबरोबर कुणीच तक्रार केली नसल्याचे सांगितले होते. पण, मंगळवारी वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमांतून आयोजकांवर कारवाई केली.
धिरियोला खेळ म्हणून मान्यता द्यावी : कॅप्टन व्हिन्जी

सासष्टी तालुक्याबरोबर गोव्याच्या बऱयाच भागात रेडे व बैलांच्या धिरियोचे आयोजन मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यात लाखो रूपये खर्च केले जातात. त्याला खेळ म्हणून कायदेशीर मान्यता देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हिन्जी व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे. आज धिरियोवर बंदी घातल्याने चोरटय़ा मार्गाने आयोजन होत आहे. जर बंदी घातली नसती आणि कायदेशीर मार्गाने आयोजन झाले असते तर सरकारच्या तिजोरीत मोठय़ा प्रमाणात महसूल जमा झाला असता असे कॅप्टन व्हिन्जी व्हिएगस म्हणाले.
धिरियोमुळे प्राणी जबर जखमी होतात त्याची क्रूरता होते हे आपल्याला मान्य नाही किंवा आपण त्याचे समर्थन करीत नाही. परंतु, जेव्हा बंदी घातली जाते, तेव्हाच असे प्रकार घडतात. जर बंदी घातली नसती आणि कायदेशीर मान्यता दिली असती तर असे प्रकार घडले नसते याकडे आमदार कॅप्टन व्हिन्जी यांनी लक्ष वेधले आहे. कायदेशीर मान्यता देताना काही नियम व अटी घातल्या गेल्या असत्या. त्यामुळे प्राण्यांची क्रूरता झाली नसती. एक खेळ म्हणूनच धिरियोकडे पाहिले पाहिजे व त्याला कायदेशीर मान्यता दिली पाहिजे असे आपले ठाम मत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अनेक आमदार व मंत्र्यांच्या नाकावर टिच्चून धिरियोचे आयोजन होत आहे. धिरियो होणार याची कल्पना सर्वांनाच असते. मात्र, राजकीय व्यक्ती गप्प राहणे पसंत करतात. त्यांनी असे गप्प राहण्याऐवजी धिरियोना कायदेशीर मान्यता देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मतही त्यांनी मांडलो.
विधानसभा अधिवेशात धिरियोला कायदेशीर मान्यता देण्याचा ठराव मांडून तो सर्वानुमते समंत करून कायदा केला पाहिजे.









