मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची उपरोधिक टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेश विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. अखिलेश आणि राहुल गांधी यांच्यात फारसा फरक नाही, केवळ एकच फरक आहे, राहुल देशाबाहेर देशाबद्दल बरळत असतात. तर अखिलेश हे राज्याबाहेर उत्तरप्रदेशबद्दल दुष्प्रचार करत असल्याचे योगी यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी सोमवारी अर्थसंकल्पावर बोलताना मूलभूत शिक्षणावर प्रश्न उपस्थित केला होता. एका शाळेत गेलो असता मुलाला मी कोण असे विचारले होते. यावर त्या मुलाने राहुल गांधी असे उत्तर दिले होते असा किस्सा अखिलेश यांनी सभागृहात बोलताना सांगितला होता. अखिलेश यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत योगींनी मंगळवारी उपरोधिक टिप्पणी केली आहे.
मूल भोळीभाबडी असतात, परंतु मनाने खरी असतात, मुलाने जे काही म्हटले असेल ते अत्यंत विचारपूर्वक म्हटले असणार. तसेही अखिलेश अणि राहुल गांधी यांच्यात फारसा फरक नसल्याचे योगींनी म्हटले आहे.









