अध्याय सत्रावा
भक्तांचा गौरव करताना भगवंत म्हणाले, उद्धवा, त्यांचा स्वधर्म म्हणजे मीच होय. कोणापाशी कधीच काही मागावयाचे नाही, असा माझ्या भक्ताचा नेम असतो. भक्ताचा हा नेम लक्षात घेऊन, त्याला पीडणाऱया क्षुधादि व्यथेचे जो निवारण करतो, त्याला अन्न, धन, वस्त्र, पात्र, मीठ वगैरे देतो त्यासाठी स्वतःचे द्रव्य खर्ची घालतो आणि त्यांचा तिरस्कार न करता संरक्षण करतो. तसेच कुठेही उपकाराची भावना नसते, उलट अत्यंत सन्मानाने व नम्रतेनेच माझ्या भक्ताचे रक्षण करतो. त्याला मी माझ्या भक्तालाही मागे टाकून आपल्या मस्तकावर घेतो व नंतर त्याला वैकुंठालाच काय पण त्याच्याही वरती नेऊन ठेवतो.
ज्याला मी आपल्या मस्तकावर घेतले, त्याला दुर्लभ असे काय असणार ? उद्धवा ! नौका जशी धनवान् मनुष्याला समुद्रामधून तारून नेते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे रक्षण करणाऱयांचा मी संसारातून उद्धार करतो. केलेले कर्म मला अर्पण होण्यासाठी, मी कर्म करणारा आहे अशी चित्तातील भावना सोडून, प्रत्येक प्राणिमात्र भगवत्स्वरूप आहे, अशी भावना धरली म्हणजे ते कर्म मला सहजी अर्पण होते. कर्माचा अभिमान सोडला की ते कर्म आपोआपच ब्रह्मार्पण
होते.
उद्धवा! त्यासाठी वेगळा संकल्प. माझ्यामुळे हे कर्म झाले आणि ते मी कृष्णार्पण केले, असा संकल्प मनाने व वाणीने केला, की त्याचे कर्तृत्व त्याच्याच अंगी येते आणि जो कर्माचा ‘कर्ता’ मी असे म्हणतो, तो त्या कर्माचा ‘भोक्ता’ ही होतो. म्हणून उद्धवा ! अहंता हीच काय ती मुख्यत्वे बाधक आहे. ज्याच्या ठिकाणी अहंममता नसते, जो निरभिमानी व निर्मम असतो, त्याच्यापाशी नित्यमुक्तताच नांदते. आता कुटुंबियांबाबत सविस्तर माहिती सांगतो. ऐक, झाडाखाली ज्याप्रमाणे पांथस्थ लोक क्षणभर एकत्र जमतात. त्याप्रमाणे बायकामुले व आप्तइष्ट या सर्वांचा समागमही क्षणिकच आहे.
दोहींकडून दोन नद्यांचे प्रवाह आले म्हणजे त्यातून वहात आलेली लाकडे त्यांच्या संगमावर एकत्र होतात, त्याप्रमाणेच सारी सोयरिंधायरीही एके ठिकाणी जमतात व एक लोंढा आला म्हणजे ती लाकडे जशी दाहीदिशाला फाकतात, त्याप्रमाणेच सोयऱयाधायऱयांचीही दशा होते.
जीव ज्या योनीत देह धारण करतो, त्या योनीत त्याच योनीची सोयरीधायरीही मिळतात. असे संसारामध्ये अनंत जन्म झालेले असतात, तेव्हा त्या साऱया जन्मांतील जीवाची सोयरी असंख्य आहेत परंतु ज्याप्रमाणे या स्वप्नातील पदार्थ काही दुसऱया स्वप्नात येत नाहीत, त्याचप्रमाणे या जन्मातील सोयरी दुसऱया जन्मात एकमेकाला ओळखत
नाहीत.
याप्रकारे बायका, मुले, भाऊबंद व सोयरीधायरी ही सारी मायामय असून केवळ काल्पनिक आहेत असे जो निश्चयकरून जाणतो, तोच खरोखर धन्य होय. असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये. एखादा पाहुणा तात्पुरता राहतो, त्याप्रमाणे राहावे. जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादीमध्ये ममता ठेवीत नाही, त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. वरीलप्रमाणे विवेक जो मनात आणतो, त्याला मोह आणि ममता कधीच बाधत नाहीत, अतिथीप्रमाणे तो घरात राहूनही अलिप्त असतो. अशा प्रकारे मान, मोह व ममता ज्याने सोडून दिली, जो घरादारात राहूनही उदासीन, निःस्पृह व निर्लोभ असतो, त्याला महंताही बाधत नाही. निर्मोह आणि निरभिमान होण्याला मुख्य कारण गुरूचे भजन आहे. त्यायोगे गुरुभक्तांना वैराग्य विवेक-ज्ञान सहजच प्राप्त होते. उद्धवा ! अशा वैराग्यविवेकाने राहिले असता गृहस्थाला घरात राहूनच निजमुक्ति प्राप्त होते. भक्ताने गृहस्थोचित शास्त्राsक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात किंवा संन्यास स्वीकारावा. जो गृहस्थ घरात राहून आश्रमधर्म पाळीत असता मुख्यत्वेकरून माझी भक्ती करितो, त्या माझ्या भक्ताला खरोखर इतर आश्रमांचे काही कारणच उरत नाही. माझे भजन कशाप्रकारे करावं तेही मी तुला सविस्तर सांगीन.
क्रमशः







