मद्यप्राशन केल्यानंतर वाद : उसाचे दांडके, लाथाबुक्यांनी मारहाण: दोघांना अटक
प्रतिनिधी/इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील भुयाचा घोळ परिसरातील ओढयात दोघांनी दारुच्या नशेत झालेल्या वादातून ऊसाच्या दांडक्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन मित्राचा खून केला. प्रविण उर्फ भावडया प्रकाश साळुंखे (३२ रा.वाटेगाववाडी विभाग), असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. तर
मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पोलीसांनी सहा तासातच दोन संशयीतांना अटक केली आहे.
गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण (३२), मोहन उर्फ बाळया चव्हाण (२४, दोघे रा. वाटेगाव वाडी ) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. मृत व आरोपी हे मित्र होते. सोमवारी रात्री हे तिघे मद्यप्राशसनासाठी एकत्र आले. काही वेळाने बोलताबोलता एकमेकांना शिवीगाळ सुरु झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. गणेश व मोहन या दोघांनी प्रविण साळुंखे याला ऊसाचे दांडक्याने हातांनी व लाथांनी तोंडावर, डोक्यात मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला. मंगळवारी सकाळी पोलीस पाटील संतोष करांडे यांना या घटनेची निनावी फोनवरून माहिती मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. त्यानंतर घटनेची माहिती कासेगाव पोलीसांना दिली. पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी घटनास्थळी जावून तपासाची चक्रे फिरवली. सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी तपासात सहभाग घेतला. श्वास पथक मागण्यात आले. हे श्वान भाटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३०० मीटर अंतरावर जावन घटमळले.पोलिसांनी कौशल्याने तपास करीत दोघांना अटक केली.