ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे.
डीएचएफएल आणि येस बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी 26 मे रोजी भोसले यांना CBI ने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 मेपर्यंत त्यांच्या वरळीच्या घरात नजरकैदेत ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
काय आहे प्रकरण?
येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांनी पदाचा दुरुपयोग करून डीएचएफएलला फायदा पोहोचवल्याचे हे प्रकरण आहे. या केसमध्ये कर्जाऊ रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे CBI च्या तपासात समोर आले आहे. सन 2018 मध्ये एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश असल्याचे सीबीआयमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) मध्ये 3700 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून गुंतवले. त्याबद्दल डीएचएफएलकडून राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डीएचएफएलनेही 3700 कोटी रुपये चित्रपट निर्माते संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, उद्योजक अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच शहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्या कंपनीत हस्तांतरित केले. यादरम्यानच वांद्रे रिक्लेमेशन पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखालीही डीएचएफएलने येस बँकेकडून 750 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. पण त्याचा उपयोगच करण्यात आला नाही व त्या रकमेचाही गैरवापर करण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी सीबीआयने 2 मे 2002 रोजी अविनाश भोसले, शाहीद बलवा व विनोद गोएंका यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला होता. भोसले व त्यांच्या कुटुंबियांची सक्तवसुली अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) तब्बल 40 कोटी 34 लाख रूपयांची मालमत्ता यापूर्वी जप्त केली आहे. फेमा (परकीय चलन विनीमय कायदा) नुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.