भिलवडी / वार्ताहर
भिलवडी येथील ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव करून तो सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना देण्यात आला. पतीच्या निधनानंतर अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाते. विधवांना धार्मिक, सामाजिक तसेच शुभकार्यात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असताना केवळ विधवा प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते. त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी ही प्रथा बंद करण्यात आली. सरपंच विद्या पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी ठरावाची प्रत मंत्री कदम यांना दिली. यावेळी पलुसचे तहसिलदार निवास ढाणे, महेंद्र लाड, विलास पाटील, शहाजी गुरव, बाळासोकाका मोहिते बी.डी.पाटील, चंद्रकांत पाटील, बाबासो मोहिते, मोहननाना तावदर, बाळासो मोरे उपस्थित होते.