पहिल्या टप्प्यात 250 एकर जागेत पर्यटनस्थळ साकारणार : रोपे लावण्याचे काम सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
उत्तर कर्नाटकात अनेक पर्यटनस्थळे आहेत. परंतु त्यांचा विकास केला गेला नसल्याने तितकेसे पर्यटक येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने हिडकल जलाशय परिसरात उद्यान काशी उभारण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये तारांगण, मनोरंजनासाठी पार्कचा समावेश असणार आहे. बेळगावपासून अवघ्या 54 कि. मी. अंतरावर हे जलाशय असल्याने पर्यटकांना ये-जा करणेही सोयीचे ठरणार आहे.
म्हैसूर येथील कावेरी नदीवर भव्य असे वृंदावन गार्डन उभारण्यात आले आहे. दरवषी लाखो पर्यटक या गार्डनला भेट देत असतात. यामुळे स्थानिकांना तर रोजगार मिळालाच याचसोबत सरकारलाही महसूल मिळत आहे. याच धर्तीवर हिडकल जलाशयाच्या परिसरात एक उद्यान उभारले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अर्थसंकल्पात 147 कोटी रुपये मंजूर केले होते. राज्याचे वनमंत्री व हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी या उपक्रमासाठी विशेष लक्ष दिले आहे.
उद्यान काशी सुरू झाल्यास केवळ कर्नाटकच नाही तर शेजारील महाराष्ट्र व गोव्यातूनही पर्यटक या ठिकाणी येणार आहेत. सध्या आचारसंहिता लागू असल्याने योजनेसाठी निविदा मागविण्याचे काम पुढे ढकलले आहे. सरकारचा वाटा मोठा असला तरी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून थोडे काम होणार आहे. उद्यान काशीमध्ये पक्षी उद्यान, फुलपाखरू उद्यान, ग्लास हाऊस, विज्ञान केंद्र, तारांगण, ओपन थिएटर, संगीत कारंजे यांचा समावेश असणार आहे.
याचसोबत बांबूचे बेट, औषधी वनस्पती पार्क यासह प्राणीसंग्रहालय, मत्स्यालय विकसित केले जाणार आहे. यासाठी रोपे लावण्याचे काम सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात 250 एकर जागेचा वापर करून घेण्यात येईल. पुढील टप्प्यात आणखी 200 एकर जागा विकसित करण्यात येणार असल्याचे मंत्री कत्ती यांनी सांगितले.









