प्रभू कुटुंबियांचे विधायक पाऊल : खडकाळ जमिनीत साकारणार सौर उर्जा प्रकल्प
प्रतिनिधी /फोंडा
गोव्यात जमिनीला सोन्याचे भाव आहेत. मात्र माणसाची दैनंदिन गरज असलेले पाणी व सौर उर्जा फुकट असूनही त्याची बचत किंवा योग्य वापर होताना दिसत नाही. भविष्यात उर्जेची टंचाई भरून काढण्यासाठी गोव्यासारख्या राज्याला आत्तापासूनच नियोजन करावे लागेल. त्यादृष्टीने उसगांव येथील प्रभू कुटुंबीयांनी विधायक पाऊल टाकले आहे. म्हारवासडा उसगांव येथील आपल्या खडकाळ व पडिक जमिनीत 6 मेगा वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी प्रभू कुटुंबीयांनी दर्शविली असून येत्या काही काळात हा प्रकल्प उसगांवात साकार होणार आहे.
डॉ. राजू प्रभू, अशोक प्रभू व त्यांच्या कुटुंबीयांची म्हारवासडा उसगांव येथे वडिलोपार्जित लाखो चौरस मिटर जमिन आहे. या खडकाळ व पडिक जमिनीत कृषी लागवड शक्य नाही. चिरेखाण किंवा अन्य प्रदूषणकारी प्रकल्प उभारण्यापेक्षा भविष्यात विजेची गरज भागविण्यासाठी सौर उर्जा पॅनल व तोही 6 मेगा वॅट क्षमतेचा उभारण्यासाठी त्यांना गोवा उर्जा विकास एजन्सीकडून पूर्व परवानगी मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा योजनेअंतर्गत साधारण 25 एकरमध्ये हा सौर उर्जा पॅनल उभारण्याचा त्यांचा प्रस्ताव असून त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व परवाने त्यांना मिळाले आहेत. हा प्रकल्प साकारल्यानंतर त्यातून वर्षाकाठी 8760 मेगा वॅट म्हणजेच 96 लाख युनिट वीज निर्मिती होणार आहे. ज्यामुळे गोव्याच्या वीज खात्याला त्यातून अतिरिक्त वीज मिळेल. सध्या गोव्यात स्वतःची वीज निर्मिती होत नसल्याने छत्तीसगड, मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातून वीज खरेदी करावी लागते. अशा प्रकारचे सौर उर्जा प्रकल्प गोव्यात उभारले गेल्यास राज्यातील विजेचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल. गोव्यात सौर उर्जेसाठी पोषक वातावरण आहे. निसर्गाकडून मिळणारी ही मोफत उर्जा वाया घालवण्यापेक्षा त्याचा वीज निर्मितीसाठी विधायक वापर झाल्यास ती भविष्याची तरतूद ठरणार आहे.
म्हारवासडा येथील ही जमिन खडकाळ व काही ठिकाणी उंच सखल असल्याने सौर पॅनल उभारण्यासाठी ती समपातळीवर आणणे गरजेचे होते. त्यासाठी लागणारी परवानगी खाण व भूगर्भ खात्याकडून मिळाली आहे. तसेच प्रकल्पासाठी पर्यावरणीय दाखलाही मिळाला आहे. हा प्रकल्प साकारल्यानंतर गोव्यातील पहिला मेगा सौर उर्जा प्रकल्प फोंडा तालुक्यात उभारण्याचा मान प्रभू कुटुंबीयांना जाणार आहे. म्हारवासडा येथील ही जमिन खडकाळ असल्याने तेथे कुठलेच कृषी पिक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे गेली अनेक वर्षे ही जमिन पडिक राहिली होती. तिचा वापर वीज निर्मितीसाठी करताना प्रभू कुटुंबीयांनी टाकलेले हे पाऊल भविष्यात दिशादर्शक ठरणार आहे.









