अडीच लाखांची हानीःसरपंचाकडून या कृत्याचा निषेध
वार्ताहर /मडकई
कवळे ग्रामपंचायतीच्या कचरा विघटीकरण शेडला अज्ञाताकडून आग लावल्याण्यात आल्याने साधारण अडीच लाख रुपयांची हानी झाली आहे. कवळे पंचायत कार्यालयासमोर ही शेड असून रविवारी रात्री 11.45 वा. सुमारास ही आग लावण्यात आली. या प्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याठिकाणी कचरा शेड उभारण्यास काही लोंकाचा विरोध होता, त्यातूनच ही दुष्कृत्य घडल्याचा संशय सरपंच राजेश कवळेकर यांनी व्यक्त केला आहे. पंचायत कार्यालयासमोर लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेरात हे दृष्टय़ दिसत असून त्याची फुटेजही पोलिसांना देण्यात आले आहेत. पंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करुन या शेडमध्ये त्याचे विघटन केले जाते व त्यानंतर हा कचरा वेर्णा व साळगाव प्रकल्पात पाठविला जायचा.
कवळे पंचायतीच्या या कचरा शेड विरोधात मागील काही ग्रामसभांमध्ये विरोध झाला होता. त्यामुळे पर्यांयी जागा शोधण्यासाठी पंचायतीने शांतादुर्गा देवस्थानकडे विनंती अर्ज केला होता. दोन भूखंडापैकी एक भूखंड पंचायतीला द्यावा, अशी मागणी कवळे पंचायतीने वारंवार केली होती. मात्र देवस्थानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यपालांना नुकतेच या समस्येसंबधी निवेदन सादर केले होते. राज्यपालांनी या निवेदनाची दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापुढे हा विषय मांडून योग्य तो तोडगा काढण्याची हमी दिली होती. मात्र पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत असे दुष्कृत्य केल्याबद्दल सरपंच कवळेकर यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सरपंच राजेश कवळेकर यांनी दिला.
ग्रामसभा रद्द करण्यामागील खुलासा
गेल्या रविवारी जाहीर केलेली पंचायतीची ग्रामसभा रद्द करण्यामागील खुलासाही सरपंच कवळेकर यांनी केला आहे. पंचायत सभागृहाचे दुरूस्तीकाम कंत्राटदाराने वेळेत पूर्ण न केल्याने सभेसाठी दुसरी जागा शोधावी लागली. सत्यनारायण देवस्थान अथवा दत्तात्रय मंदिराच्या सभागृहात ही ग्रामसभा घेण्याचा प्रस्ताव पंचायत मंडळापुढे मांडला होता. मात्र काही महिला पंचायत सदस्यांना अडचण असल्याने मंदिरात सभा घेणे शक्य झाली नाही. अन्य एक पर्याय म्हणून कवळे येथील सरस्वती हायस्कूलच्या सभागृहात ग्रामसभा घेण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षांशी संपर्क साधला होता. तेथेही परवानगी मिळू न शकल्याने अखेर सभा रद्द करण्यावाचून अन्य पर्याय नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभा रद्द करण्यात आल्याची माहिती फोंडा गट विकास अधिकाऱयांना दिली होती. पंचायत मंडळाचा कार्यकाळ संपण्यासाठी अजून 15 दिवस बाकी आहेत. या कालावधीत रद्द केलेली ग्रामसभा घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.









