अध्यक्ष शशिकांत घाडी यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
अडीच वर्षापूर्वी ओबीसी समाजातील सर्व बांधवांना एकत्र आणण्यासाठी ओबीसी महासंघाचे काम सुरू केले होते ते साध्य होत आहे. प्रत्येक तालुक्यात मेळावा घेण्यात येणार आहे. दि. 5 जून रोजी पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात तिसवाडी तालुका ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9 वा हा मेळावा सुरू होऊन सायं. 7 वा. संपेल अशी माहिती अखिल भारतीय ओबीसी महासभा गोवाचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गोवा राज्याचे निमंत्रक पंकज नमशीकर, तिसवाडी महामेळाव्याचे कार्याध्यक्ष अविनाश भोसले, महामेळाव्याचे स्वागताध्यक्ष व महासंघाचे सल्लागार शिरोडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काणकोण तालुक्यात यापूर्वी महामेळावा घेण्यात आला होता. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. आता तिसवाडी तालुक्यात महामेळावा आयोजित करून दुसरा प्रयोग करण्यात येणार आहे. सदर महामेळावा करण्यामागे ओबीसीची जनगणना अजूनपर्यंत होत नसल्याने ती होणे गरजेचे आहे. तसेच ओबीसी समाजातील बेरोजगार युवकांना नोकरी मिळणे, या मागण्या प्रामुख्याने सरकारी दरबारी मांडल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत यावर काहीच उत्तर आलेले नाही असे घाडी यांनी सांगितले.
रविवार दि. 5 जून रोजी इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाच्या मोठय़ा सभागृहात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वा. मशालज्योत फेरीला आझाद मैदानावरून सुरूवात होईल. त्यानंतर सकाळी 10 वा. महामेळाव्याचा उद्घाटन समारंभ होईल. या महामेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर व सामाजिक कार्यकर्ता राजेश हळर्णकर, सकाळी व सायंकाळी विविध प्रकारची सत्रे होतील. या सत्रात माजी आमदार पांडुरंग मडकईकर, रोहन हरमलकर उपस्थित असतील. तसेच समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा होईल. त्यानंतर चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम होतील अशी माहिती पंकज नमशीकर यांनी यावेळी दिली.