ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शुक्रवारी NCB कडून क्लीनचिट मिळाली. त्यानंतर आर्यन खानवर कारवाई करणारे एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर कारवाईचे आदेश एनसीबीने दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचेही एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर आता वानखेडे यांची चेन्नईला DGTS पदी (करदाते सेवा महासंचालक) बदली करण्यात आली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. त्यामध्ये आर्यन खानला क्लीनचिट मिळाली. त्यानंतर वानखेडे यांच्यावर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. वानखेडे यांची एनसीबीमधून त्यांच्या मूळ संवर्गातील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळात बदली झाली. आर्यन खान याला क्लीनचिट दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात वानखेडे यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येते होते. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी एक सूचक ट्विटही केले होते. “त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही. तुम्ही जर असे केले तर कोणतीही प्रगती होणार नाही. तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला नेहमी गोष्टींच्या सकारात्मक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही जे करता त्यावर तुमचं नियंत्रण असतं.”