तापाचे अद्याप 1 लाख रुग्ण ः तरीही स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी राजधानी प्योंगयांगमध्ये लॉकडाउन शिथिल करण्याची घोषणा केली आहे. तेथे रहस्यमय तापाचे अद्याप 1 लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर उत्तर कोरियाच्या सरकार नियंत्रित प्रसारमाध्यमांनुसार तेथे कोरोना महामारी आता बऱयाचअंशी नियंत्रणात आहे.
किम यांनी या महामारीला देशासाठी मोठे आव्हान ठरविले होते. महामारीच्या वाढत्या रुग्णांसह तेथे लसींची कमतरता आणि अन्न तुटवडय़ाला उत्तर कोरिया सामोरा जात असल्याने किम यांनी कठोर लॉकडाउनची घोषणा केली होती.
किम यांनी अधिकाऱयांसोबत महामारीच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत अधिकाऱयांसोबत चर्चा केल्यावर कोरोना महामारीची स्थिती पूर्वीपेक्षा नियंत्रणात असल्याने लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे किम यांनी म्हटले आहे.
सुमारे अडीच वर्षांपर्यंत कोरोना विषाणूपासून बचावल्याच्या दाव्यानंतर उत्तर कोरिया सध्या रहस्यमय तापाला तोंड देत आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत उत्तर कोरियामध्ये 1 लाख नव्हे तर 20 लाख लोक तापाने फणफणत होते असाही दावा करण्यात आला आहे. 12 मे रोजी उत्तर कोरियाने पहिल्यांदा देशात कोरोना विषाणू आढळून आल्याची घोषणा केली होती. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी किम यानी सैन्याला राजधानी प्योंगयांग आणि देशभरात औषधांच्या वितरणाच्या कार्यात सामील केले होते.









