ऑनलाईन टीम/तरुण भारत
सातारा: संभाजीराजे (Sambhaji Raje)छत्रपती यांनी शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje) भोसले यांची साताऱ्यात धावती भेट घेतली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंचा गेम केला असल्याचं वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलं होतं. यावर संजय राऊत (Sanjay Raut) आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये अशी टीका केली होती. त्यातच आज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान, श्रीमंत शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. संभाजीराजे यांच्यावर टीका करत श्रीमंत शाहू महाराजांनी शिवसेनेची बाजू घेताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना फोनवर संपर्क करुन चर्चा केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ओबीसी समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापुरातून शिवसेनेने उमेदवार दिला म्हणून आपलाही उमेदवार कोल्हापुरातून दिला आहे. तर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेवर आता टांगती तलवार आहे. त्यातच आज दोन राज्यांच्या भेटीने राजकारणात ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय म्हणाले होते शिवेंद्रराजे
राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीत संभाजीराजे छत्रपतींचा गेम झाला आणि तो कुणी केला याची त्यांना चांगलीच माहिती आहे. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता अशी टीका त्यांनी केली. तर शिवेंद्रराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावरही टीका झाली.