‘त्या’ त्रिकुटाला माळमारुती पोलीस चौकशीसाठी घेणार ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी पोलिसांनी एका त्रिकुटाला अटक करून 20 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. एक वर्षापूर्वी श्रीनगर गार्डनजवळील एक सराफी पेढी फोडल्याची कबुली या त्रिकुटाने दिली असून माळमारुती पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत.
खाजा अस्लम ऊर्फ रफिक सय्यद शेख (वय 32), इरफान खताल शेख (वय 32) दोघेही राहणार सत्यसाई कॉलनी, वैभवनगर, तंजीम इस्माईल खानापुरी (वय 30) मूळचा राहणार खानापूर सध्या राहणार सिद्धेश्वरनगर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटाने एपीएमसी व माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या नऊ चोऱया, घरफोडय़ा आपणच केल्याची कबुली दिली आहे.
एक वर्षापूर्वी राघवेंद्र ज्वेलर्स ही सराफी पेढी फोडण्यात आली होती. याच टोळीने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात आठ व माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक असे एकूण नऊ गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.









