यंदा 90 टन आंब्यांची विक्री : 1.35 कोटी रुपयांची उलाढाल : चार दिवसांपासून चाललेल्या आंबा महोत्सवाची सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खात्यामार्फत भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवाला यंदा खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील चार दिवसांपासून चाललेल्या आंबा महोत्सवाची रविवारी सांगता झाली. यंदाच्या आंबा महोत्सवात तब्बल 90 टन आंब्यांची विक्री झाली. यातून 1.35 कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती बागायत खात्याने दिली आहे.
क्लब रोड येथील हय़ूम पार्कमध्ये भरविलेल्या आंबा महोत्सवात विविध जातींचे आंबे दाखल झाले होते. विशेषतः कोकणातील हापूस, पायरी, नीलम व सेंद्रीय खतावर निर्मिती केलेल्या आंब्यांची विक्री अधिक झाली. अपेक्षेपेक्षा आंबाप्रेमींचा प्रतिसाद वाढल्याने तिसऱया दिवशीच आंबा संपला होता. शेवटच्या दिवशी खवय्यांना कोकणातील आंबा मिळालाच नाही. त्यामुळे नागरिकांना कर्नाटकातील धारवाड आणि इतर स्थानिक आंब्यांवर समाधान मानावे लागले.
या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, नीलम, कोकण सम्राट, रत्नाबारामासी, दसेहरी, गोवा, मानखूर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली यासह शुगर फ्री आदी 25 प्रजातींचे आंबे आकर्षण ठरले होते. विशेषतः कोकणातील आंब्यांना मागणी वाढली होती. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात पहिल्या दिवशी उच्चांकी 24 टन आंब्यांची विक्री झाली होती.
शेतकऱयांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री करता यावी, याकरिता बागायत खात्यामार्फत दरवषी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड, मालवण येथील आंबा उत्पादक सहभागी झाले होते. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर भरलेल्या या महोत्सवाला कोल्हापूर येथील पणन विभागाचे सहकार्य मिळाले. प्रथमच कोकणातील आंबे उत्पादक सहभागी झाल्याने आंब्यांची उच्चांकी विक्री झाली. 2018 ला 70 टन तर 2019 च्या आंबा महोत्सवात 87 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या महोत्सवात विक्री अधिक झाली आहे.
शुगर फ्री आंबे महोत्सवाचे आकर्षण
कर्नाटकाबरोबर महाराष्ट्रातील आंबा उत्पादक सहभागी झाले होते. याला आंबाप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. एकाच छताखाली विविध जातींचे आंबे मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कोकणातील मालवण, सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या आंब्यांची चव चाखता आली. याबरोबरच शुगर फ्री आंबे आकर्षण ठरले.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)









