पृथ्वीराज पाटील यांची माहिती : माधवनगर रोडवरील रेल्वे पुलाच्या कामाला लवकरच प्रारंभ
प्रतिनिधी/सांगली
माधवनगर रोडवरील चिंतामणीनगरजवळच्या चार पदरी उड्डाणपुलासाठी पहिल्या टप्प्यातील 76 लाख, 48 हजारांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात लवकरच होणार असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, सुरुवातीला रेल्वेने चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे दुपदरीकरण करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी 17 कोटी, 56 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु या पुलावर होणारी वाहनांची गर्दी आणि त्यामुळे होणारे वाढते अपघात लक्षात घेऊन याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन या पुलाच्या चौपदरीकरणाची मागणी केली होती. कारण या पुलाच्या चौपदरीकरणासाठी रेल्वे निधी देऊ शकत नव्हते. रेल्वेने फक्त दुपदरीकरणासाठीच निधी मंजूर केला होता. त्यामुळे चौपदरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मंजुरीकरिता सूचित केले होते. चव्हाण यांनी या मागणीची दखल घेऊन मंत्रालयात आपल्या दालनामध्ये एक बैठक घेतली. त्यावेळी रेल्वे खात्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता, कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच सांगली व मिरज विभागाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि आपण स्वतः या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पुलासंबंधी सादरीकरण केले. आपण स्वतः या पुलाचे चौपदरीकरण किती आवश्यक आहे, हे मंत्री महोदयांना पटवून दिले होते, आणि त्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार चव्हाण यांनी या कामासाठी 5 कोटी, 37 लाखांचा निधी मंजूर करण्यास मान्यता दिली. सदर निधीमधून पहिल्या टप्प्याचा 76 लाख, 48 हजारांचा निधी नुकताच वर्ग करण्यात आला आहे.
या निधीतून पुलाबरोबरच बायपासच्या अलीकडेपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे, तसेच बायपासपासून सांगली कॉलेज कॉर्नरपर्यंतचा रस्ताही चौपदरी होणार आहे. त्याच्यासाठीही निधी मंजूर करण्याची विनंती आपण ना. चव्हाण यांना केली आहे. ते म्हणाले, पहिल्या टप्प्याचा निधी वर्ग झाल्यामुळे पुलाच्या कामाचे भूमिपूजन जून महिन्याच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडय़ात मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. त्यांना निमंत्रितही करण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले.