घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड : परस्पर विरोधी फिर्यादी : आठजणांवर गुन्हा, दोघांना अटक
प्रतिनिधी/मिरज
शहरातील हायस्कूल रोड, जमखानवाले चौक येथे क्रिकेट बेटींगमधील पैशांच्या कारणातून वाद झाल्याने शनिवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. घरावर दगडफेक करण्यासह मोटारसायकलींचीही तोडफोड करण्यात आली. तसेच धारदार हत्यारे घेऊन हल्लाही करण्यात आला. याप्रकरणी विश्वेश धोंडीराम घोडके आणि लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार यांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाकडील आठ जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. क्रिकेट बेटींगच्या वादातून झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे हायस्कुल रोड परिसरात तणाव होता.
विश्वेश घोडके यांच्या फिर्यादीनुसार जखमी लियाकत इनामदार, क्लबचालक मुजाहिद मुतवल्ली, बापू उर्फ नाविद शरिकमसलत, गोगा उर्फ शाहिद मुल्ला, नदीम शरिकमसलत (सर्व. रा. मुजावर गल्ली, मिरज) यांच्याविरुध्द दगडफेक व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तर लियाकत इनामदार यांच्या फिर्यादीनुसार विश्वेश घोडके याच्यासह अन्य दोघांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, विश्वेश घोडके याचा भाऊ विशाल घोडके हा क्रिकेट बेटींग घेतो. त्याच्याकडे लायक याचा भाऊ नाविद शरीकमसलत हा काम करीत होता. काही दिवसांपूर्वी विशाल व नाविद या दोघांमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून भांडण झाले होते. त्यामुळे विशाल याने नावेद याला कामावरुन काढले होते. त्यानंतर नावेद याचे इतर काही जणांसोबत भांडण झाल्यानंतर याच्यामागे विशाल हाच असल्याचा संशय नावेद याला होता.
शुक्रवारी रात्री या कारणावरुन नावेद याचा साथीदार लायक याने विश्वेश याला याबाबत जाब विचारण्यासाठी फोन केल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. विश्वेश याने लायक याला घराजवळ बोलावले. लायक व त्याचे अन्य साथीदार विश्वेश याच्या घराजवळ गेले. विश्वेश हा घराबाहेर न आल्याने त्याच्या घरावर तुफान दगडफेक करुन खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली.
याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. रक्तबंबाळ अवस्थेत लायक व साथिदारांनी तेथून पळ काढला. विश्वेश घोडके हा दगडफेक प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा लायक याच्या साथीदारांनी विश्वेश याच्या घराजवळ जावून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी पुन्हा तेथे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत हा राडा सुरूच होता.
पोलिसांनी याप्रकरणी जखमी लियाकत इनामदार आणि विश्वेश घोडके या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही गटाकडील फिर्यादी दाखल केल्या. विश्वेश याच्या फिर्यादीनुसार, लियाकत इनामदार याच्यासह त्याच्या सहा ते सात साथीदारांनी घरावर दगडफेक करुन मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लियाकत इनामदार याच्या फिर्यादीनुसार विश्वेश याने कोयता घेऊन डोक्यात वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटाकडील परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करुन आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. यातील लायक इनामदार आणि विश्वेश घाडके या दोघांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता लायक याची जामीनावर सुटका झाली. तर विश्वेश याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.