वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धाला 94 दिवस झाले आहेत. याचदरम्यान रशियाने 1 हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणाऱया जिरकान क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. या हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचा वेग आवाजापेक्षा 9 पट अधिक आहे. भारताच्या ब्ा्राह्मोसच्या तुलनेत हा वेग 3 पट अधिक आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार क्षेपणास्त्राला बॅरेंट्स समुद्रात तैनात ऍडमिरल गोर्शकोव्ह या युद्धनौकेवरून डागण्यात आले आहे.
या क्षेपणास्त्राने पांढऱया समुद्रात सुमारे 1 हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेतला आहे. मागील महिन्यात रशियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘सरमट’चे परीक्षण केले होते. युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने शक्तिप्रदर्शनाचे सत्र सुरूच ठेवले आहे.
युद्धामुळे युक्रेनच्या लुहान्स्कमध्ये 3,400 हून अधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. यात 479 उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे. तर मायकोलाइव्हमध्ये शनिवारी झालेल्या रशियाच्या बॉम्बवर्षावत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तर 6 जण जखमी झाले आहेत. युद्धादरम्यान आतापर्यंत 242 मुलांना जीव गमवावा लागला तर 440 मुले जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
लीमन शहरावर कब्जा
रशियाच्या सैन्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱया युक्रेनच्या लीमन शहरावर कब्जा केला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या शहराची लोकसंख्या 20 हजार इतकी होती. या शहराचे जुने नाव कसीनी लीमन आहे. लीमन हे शहर पूर्व डोनेट्स्क भागात असून युक्रेनकडून नियंत्रित स्लोविअंस्क आणि क्रामटोर्स्क शहराच्या दिशेने जाणाऱया मार्गावर लीमन शहर आहे.
पुतीन यांचा इशारा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढविण्याच्या विरोधात इशारा दिला आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा धोकादायक ठरला असून यामुळे स्थिती अधिकच बिघडणार असल्याचे पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रीन आणि जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांना सांगितले आहे.
रशियाकडून स्टीलची चोरी
युक्रेनने रशियावर मारियुपोल शहरातून स्टील चोरी केल्याचा आरोप केला आहे. रशियाने मारियुपोल येथे चोरलेल्या स्टीलची वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. येथून 3 हजार टन स्टील जहाजांद्वारे रशियाच्या रोस्तोव-ऑन-डॉन शहरात पाठविण्यात आले आहे. मारियुपोल बंदरावर रशियाच्या कब्जापूर्वी सुमारे 2 लाख टन धातू आणि 170 दशलक्ष डॉलर्स किमतीचे कास्ट आयर्न ठेवण्यात आले होते अशी माहिती मारियुपोलच्या लोकपाल ल्यूडमिला डेनिसोव्ह यांनी दिली आहे.









