मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाद्वारे पृथ्वीवर कोठेही स्थानिक पातळीवर पिण्याचे आणि स्वयंपाकाचे पाणी तयार आणि वितरित केले जाऊ शकते, अशा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या स्थापनेसंबंधी वेआऊट इंटरनॅशनल ही स्वीडिश कंपनी आणि गोव्यातील ईपी कामत ग्रुप या कंपन्यांनी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱया केल्या.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, पर्यटकांचे नंदनवन असलेले गोवा राज्य प्लास्टिकमुक्त करण्याच्यादृष्टीने या कंपन्यांनी हाती घेतलेला हा एक आदर्श उपक्रम आहे, असे सांगून दोन्ही कंपन्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. ’ग्रीन गोवा, क्लीन गोवा’ च्या संकल्पनापूर्तीसाठी याची निश्चितच मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वेआऊट इंटरनॅशनलचे सीईओ उल्फ स्टेनरहॅग, ईपी कामत ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार कामत, आणि ग्लोबल वेआउट इंटरनॅशनलच्या अतिका चोना यांची उपस्थिती होती.
वेआऊट ही कंपनी उच्च दर्जाच्या, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पिण्याच्या पाण्यासाठी जल उत्पादन प्रणाली प्रदान करते, ज्यामुळे पाण्यातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणखी मदत होते. तसेच राज्याच्या भविष्यातील संसाधनांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो, असे उल्फ यांनी सांगितले.
श्री. कामत यांनी बोलताना आपली कंपनी सरकारच्या ’स्वच्छ भारत’ मिशनशी संबंधित असून त्याचाच भाग म्हणून स्वच्छता आणि सांडपाणी पुनर्वापर क्षेत्रात कंपनीने दर्जेदार संशोधनात्मक उपाययोजना राबविल्या असल्याची माहिती दिली. एसटीपी, ईटीपी यासारख्या जलप्रक्रिया क्षेत्रात ही कंपनी आघाडीवर आहे. यापुढे, ’एकदाच वापरल्या जाणाऱया प्लास्टिक बाटल्यांचे उच्चाटन करणे’ हे आपले मुख्य ध्येय असेल, असेही ते म्हणाले. आपल्या विद्यमान तंत्रज्ञानाचा गोव्यात पर्यटन स्थळे, औद्योगिक वसाहती तसेच शिक्षण आणि इतर संस्था यांना मोठा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला.









