कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिह्यात बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱया बांगलादेशी नागरिकांना बीएसएफने शुक्रवारी अटक केली. भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने चौघांना पकडले. मात्र, सद्भावना आणि चांगल्या संबंधांमुळे त्यांना पुन्हा बांगलादेशकडे परत देण्यात आले आहे. सदर चार बांगलादेशी नागरिक रोजगाराच्या शोधात भारतात प्रवेश करण्याच्या पवित्र्यात होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्यांना मानवता आणि सद्भावना म्हणून सीमा सुरक्षा दलाने पकडले आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) स्वाधीन केले.
बीएसएफच्या 68 बटालियनच्या जवानांनी या चार बांगलादेशी नागरिकांना शुक्रवारी दुपारी 3.40 वाजता पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिह्यात बॉर्डर आउट पोस्ट रंगघाटजवळ बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) ओलांडताना पकडले. बांगलादेशच्या सतखीरा जिह्यातील तिजीउल सरदार (37) आणि त्याची पत्नी नसीमा बेगम (31) तर इतर दोन लोक शाहनूर बेगम (35) आणि नईम हुसेन (23) हे अनुक्रमे बांगलादेशातील खुलना आणि केरनीगंजचे नागरिक होते, असे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. बेरोजगारीमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अडचणी येत असल्यामुळे ते सर्वजण रोजगारासाठी भारतात येत होते, असे बीएसएफ अधिकाऱयांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या हवाल्याने सांगितले.









