ही कथाही भविष्यकाळाची चुणूक दाखविणारी आहे. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून लोकांना पाण्यासाठी रेशनकार्डांसारखी कार्डे देण्यात आली आहेत. ही कार्डे दाखवूनच दिवसाला केवळ पाच लिटर पिण्याचे पाणी मिळू शकते. तेही दररोज मिळेल याची शाश्वती नाही. आठवडय़ातून दोन वेळा प्रत्येकी 15 लिटर पाणी एका घरात देण्यात येते. या गावांमधील पाण्याची टंचाई पाहून या गावातील मुलांना आपल्या मुली देण्यास इतर गावांमधील लोक तयार होत नाहीत. त्यामुळे येथील बऱयाच युवकांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे.
येथील विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. बोअरवेलनाही पाणी लागत नाही. त्यामुळे सर्वस्वी टँकरवर अवलंबून रहावे लागते. या गावांची एकूण लोकसंख्या 10 हजारच्या आसपास आहे. त्यांना कार्डावर रेशन पुरेशा प्रमाणात मिळते. पण पाणी अत्यंत अपुरे आहे. आठवडय़ातून केवळ दोनदा पाण्याचा टँकर येतो. पाण्याची वाट पाहात तासन्तास घालवावे लागतात. त्यामुळे पुरुष कामाला वेळेवर जाऊ शकत नाहीत. परिणामी अनेकांची नोकरीही जाण्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे गृहिणींना पाणी आणण्याची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. पाण्यासाठी अनेकदा मारामाऱया घडल्यामुळे गावातील शांतताही बिघडली आहे. गावापासून चार किलोमीटर दूर केवळ एक झरा आहे. तो पावसाळय़ात पुरेसे पाणी देतो. पण हिवाळय़ाच्या अखेरीस आणि संपूर्ण उन्हाळाभर पाण्याची प्रचंड कमतरता जाणवते. उत्तर प्रदेश सरकारने आता या भागासाठी पाणी योजना दिली आहे. मात्र, ती लागू होण्यास तीन-चार वर्षांचा अवधी लागण्याची शक्मयता आहे.









