आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेल्या दोन युवकांनी रोबोटिक्स क्षेत्रातील लठ्ठ वेतनाच्या नोकऱया सोडून भाजीच्या शेतीचा पर्याय स्वीकारला आणि आता ते कोटय़वधींची कमाई करीत आहेत. ही प्रेरणादायक कथा आहे, राजस्थानातील चितोडगड जिल्हय़ातील रावतभाटा येथील निवासी अभय सिंग आणि गंगानगर येथील के. अमितकुमार यांची. या दोघांनीही मुंबई आयआयटीतून रोबोटिक्स क्षेत्रात पदवी मिळविली आहे. याच क्षेत्रात त्यांची संशोधक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, या कामात समाधान न वाटल्याने त्यांनी गावाकडे परतून शेती व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.

या शेतीतही त्यांनी त्यांचे तंत्रवैज्ञानिक कौशल्य प्रदर्शित केले. मातीविना शेतीचा प्रयोग सुरू केला. तसेच किटनाशक न वापरता ‘शुद्ध उत्पादने’ घेण्याचे ठरविले. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी एका स्टार्टअप कंपनीची स्थापना करून शेती सुरू केली. हा त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला असून आता त्यांच्या कंपनीची उलाढाल कोटय़वधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या भाजीला 75 शहरांमध्ये मागणी असून विदेशी निर्यात करण्याचीही योजना आहे. लठ्ठ पगाराच्या नोकरीत शिल्लक टाकलेला पैसा त्यांनी शेतीत गुंतवला आणि एकाचे दहा या न्यायाने या गुंतवणुकीची कित्येक पट वाढ करून मोठा नफा ते कमवित आहेत.
शेती हा नेहमी आतबट्टय़ाचा धंदा असतो, ही समजूत त्यांनी त्यांच्या अनोख्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून मोडीत काढली आहे. प्रयोग करण्याची तयारी असेल आणि थोडा धोका पत्करण्याचे धाडस असेल तर शेतीतूनही एखाद्या कारखान्यासारखा नफा कमावता येतो. इतकेच नव्हे तर लोकांच्या आरोग्याचीही काळजी वाहता येते, हे त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी उदाहरणावरून दाखवून दिले आहे. राजस्थान सरकारनेही त्यांच्या प्रयोगाची दखल घेतली आहे.









