दुसऱया दिवशीही आंबा महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद : कोल्हापूर येथील पणन संस्थेच्या सहकार्याने आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खात्यामार्फत भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवात एका दिवसात तब्बल 24 टन आंब्यांची विक्री झाली आहे. तर दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवारी देखील आंबे खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या आंबा महोत्सवात 100 टनाहून अधिक आंब्यांची विक्री होईल, असा विश्वास बागायत खात्याने व्यक्त केला आहे. क्लब रोड येथील हय़ूम पार्कमध्ये हा आंबा महोत्सव सुरू आहे.
बागायत खात्यामार्फत उत्पादक शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा बेंगळूर येथील मँगो बोर्डाकडून आंबा महोत्सवासाठी अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आंबा महोत्सव भरणार की नाही? असा संभ्रम होता. अखेर कोल्हापूर येथील पणन संस्थेच्या सहकार्याने आंबा महोत्सव भरला आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर भरलेल्या आंबा महोत्सवात आंबाप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात 24 टन विविध जातीच्या आंब्यांची विक्री झाली आहे.
यंदाच्या आंबा महोत्सवात विशेषतः कोकणातील हापूस, पायरी, निलम आदी 25 प्रजातींचे आंबे दाखल झाले आहेत. प्रथमतःच कोकणातील आंबेविपेते दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणातील आंब्यांची विक्री वाढली आहे. यंदा मोठय़ा प्रमाणात आंब्यांची विक्री होत आहे. 2018 च्या आंबा महोत्सवात 70 टन तर 2019 च्या आंबा महोत्सवात 97 टन आंब्यांची विक्री झाली होती.
या महोत्सवात हापूस, पायरी, निलम कोकण सम्राट, रत्नाबारामासी, दसेहरी, गोवा मानकूर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली यासह शुगर फ्री आंब्यांना पसंती वाढली आहे. रविवार दि. 29 मेपर्यंत हा आंबा महोत्सव चालणार आहे.
कोकणच्या आंब्याला पसंती
यंदा भरविलेल्या आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी मोठी विक्री झाली आहे. कोकणातून दाखल झालेल्या हापूस, पायरी व निलम आंब्यांना पसंती वाढली आहे. याबरोबरच शुगर फ्री आंबे देखील दाखल झाले आहेत.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)









